Durgadi fort : शिवरायांनी बांधलेला कल्याणमधील दुर्गाडी बुरुज ढासळला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून काही भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यातच कल्याणमधून (Kalyan) आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याणमधील छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज (Historic Durgadi Fort) ढासळला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचं कळताच पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर असून येथे अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येतात. त्यातच अचानक किल्ल्याचा बुरुज ढासळल्याने हिंदू बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

निधी न मिळाल्याने दुरुस्तीचे काम अपूर्ण
मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले होते. त्यामधील पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटीचा निधी मंजूर झाला. मात्र आचारसंहितेमध्ये निधी न मिळाल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असं शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले. हा निधी लवकरात लवकर मिळायला हवा जेणेकरून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करता येईल, अशी मागणी देखील रवी पाटील यांनी केली.

अनेक वर्षांपासून होत आहे दुरुस्तीची मागणी
स्वराज्याच्या आरमाराचं एक केंद्र म्हणून कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. विस्तीर्ण खाडी परिसर आणि त्यालाच लागून किल्ला उभारण्यात आला होता. पण मागील अनेक दिवसांपासून या किल्ल्याची दुरावस्था होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. पाच वर्षांपूर्वी देखील किल्ल्याचा बुरुज ढासळला होता. आता या घटनेनंतर तरी किल्ल्याला पुरेसा निधी मिळून दुरुस्तीचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न शिवप्रेमी विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *