महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुन ।। आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ३५ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. मात्र शेवटी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. या विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. तर स्कॉटलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून इंग्लंडने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि मार्कस स्टोइनिसने ८० धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला दमदार कमबॅक केलं.
ट्रेविस हेड ४९ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची खेळी करत माघारी परतला. तर मार्कस स्टोइनिसने २९ चेंडूंचा सामना करत ५९ धावांची खेळी केली. शेवटी टीम डेव्हिडने १४ चेंडूंचा सामना करत २८ धावांची खेळी केली. त्याने शेवटी षटकार मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.