महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुन ।। EVM Can Be Hacked Elon Musk: भारतातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यंदा इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्सची म्हणजेच ईव्हीएमची फारशी चर्चा झाली नाही, असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळाला. अर्थात निवडणुकीदरम्यान अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएममधील बिघाड आणि इतर गोंधळांमुळे ईव्हीएम चर्चेत राहिलं हे नक्की. मात्र आता उत्तर-पश्चिम मुंबईच्या मतदारसंघात रविंद्र वायकर यांनी केवळ 48 मतांनी मिळवलेला विजय चर्चेचा विषय ठरत आहे तो ईव्हीएममधील कथित फेरफार. अगदी राष्ट्रीय काँग्रेसपासून ते माजी मंत्री तसेच विद्यमान आदित्य ठाकरेंपर्यंत अनेकांनी यावरुन आक्षेप घेतलेला असतानाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कनेही ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका नेत्याने व्यक्त केलेल्या चिंतेवर मस्क यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मूळ पोस्ट काय?
अमेरिकेत होणाऱ्या 2024 राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या रॉबर्ट एफ. केनडी ज्युनिअर यांनी पोर्टो रीको येथे झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, असं ‘असोसिएट प्रेस’ या वृत्तसंस्थेचा संदर्भ देत आपल्या एक्स (ट्वीटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र नशिबाने या निवडणुकीमध्ये पेपरवर मतं नोंदवण्यात आल्याने गोंधळ लक्षात आला निसटलेली मतं मोजली गेली, असंही केनडी यांनी सांगितलं. मात्र पेपर नसते तर काय झालं असतं? असा प्रश्न केनडी यांनी उपस्थित केला.
अमेरिकेतील जनतेला त्यांचं प्रत्येक मतं मोजलं गेलं आहे हे कळलं पाहिजे. त्यांची निवडणूक आणि मतदान हॅक होऊ शकत नाही असंही केनडी म्हणाले. आपण पुन्हा बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात करुन निवडणुकीत ईलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून होणारी फेरफार टाळली पाहिजे. मी सत्तेत आल्यास पेपरवर प्रामाणिक आणि कोणताही भेद नसणाऱ्या निवडणुका घेण्याचं आश्वासन देतो, असं केनडी यांनी सांगितलं.