महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुन ।। : अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करून यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळण्याचा मान पटकावला. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तर अफगाणिस्तान अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. आशियाई देश अफगाणिस्तानने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी बांगलादेशचा पराभव करून पहिल्यांदाच आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
अफगाणिस्तानच्या या विजयामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अटीतटीच्या लढतीत बांगलादेशला पराभवाची धूळ चारून अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम केला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाऊस, राशिद खानचे वादळ आणि लिटन दासची संयमी खेळी… यामुळे हा सामना प्रेक्षणीय ठरला. पण, अखेर आठ धावांनी सामना जिंकून राशिद खानच्या नेतृत्वातील संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. २७ जून रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील, तर २९ तारखेला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल.
उपांत्य फेरीतील सामने –
उपांत्य फेरी १ – दक्षिण आफ्रिका विरूद्ध अफगाणिस्तान, २७ जून सकाळी ६ वाजल्यापासून
उपांत्य फेरी २ – भारत विरूद्ध इंग्लंड, २७ जून रात्री ८ वाजल्यापासून
अफगाणिस्तान चौथा ठरला संघ
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मधील अखेरचा सामना नाना कारणांनी खास ठरला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य अवलंबून होते. कारण दोन्हीही संघांसाठी उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती. याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होणार होता. पण, पावसाची बॅटिंग अन् साऱ्यांचीच धाकधुक वाढली. अखेर अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकून प्रथमच उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११५ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. पण, पावसामुळे अनेकदा सामना थांबवावा लागला. मग एक षटक कमी करण्यात आले. राशिद खानने सर्वाधिक चार बळी घेऊन बांगलादेशला १७.५ षटकांत १०५ धावांवर सर्वबाद केले आणि ८ धावांनी सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला, तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. यासह यंदाच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला आहे.