महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। महाराष्ट्रात मौसमी पावसाचा जोर आणखीच वाढणार असून येत्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून सध्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या उपसागरातील ओडिशालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळ किनारपट्टीलगत हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
त्यामुळे किनारपट्टी तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे आणि सातारा या पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे घाटमाथ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात प्रति तास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने शनिवारी मुंबईसह उपनगर, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणासह रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काही महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, मान्सूनने शुक्रवारी (२८ जून) राजधानी दिल्लीत प्रवेश केला. त्यामुळे अनेक भागात सोसाट्यांच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. काही ठिकाणी वाहने देखील पाण्यात बुडाली. आता मान्सूनचा पुढचा प्रवास राजस्थानमधील जैसलमेर, चुरू, दिल्ली, अलिगड, कानपूर, गाझीपूर खेरी, मुरादाबाद, उना, पठाणकोट आणि जम्मू असा राहणार आहे.