Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान; देऊळवाड्यात राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। तुकाराम, तुकाराम असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हातात भगव्या पताका घेऊन आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या नामघोषात देहूनगरी दुमदुमली.

भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यांमध्ये विविध खेळ खेळले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी देऊळवाड्यात पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला.

रितीरिवाजानुसार, पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले. साडेचार वाजता काकडा झाला. पाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली.

संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा झाली. साडेपाच वाजता जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली.

भजनी मंडपात सकाळी दहा वाजता भानुदास महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घोडेकर बंधू (सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदार वाड्यात आणल्या.

इनामदारवाड्यात दिलीप महाराज गोसावी इनामदार यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. मानकरी म्हसलेकर दिंडी यांनी डोक्यावर पादुका घेऊन संबळ, टाळमृदंग आणि तुतारी या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या.

दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात पादुका आणि माउलींच्या पादुकांची जालना जिल्ह्यातील वाकुलोणी गावातील पूजेचे मानकरी ठरलेले ज्येष्ठ वारकरी नाना महाराज तावरे, खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार महेश लांडगे,

सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती झाली. कोथरूड येथील ग्रामोपाध्याय सुहास टंकसाळे यांनी पौराहित्य केले. पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे व इतर उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी नऊ वाजता महाद्वारातून मानाच्या दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर दिंड्या पान दरवाज्यातून बाहेर पडत होत्या. अकलूज येथील मोहिते-पाटील व बाभूळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पूजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला.

देऊळवाड्यात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदिक्षणा सुरू होताच ज्ञानोबा-तुकारामचा नामघोष आणि विठुनामाचा गजर झाला. वारकरी फुगड्या घरू लागले. देहभान विसरून नाचू लागले. मानाच्या दिंड्या अन् मानाचे अश्व सज्ज होते.

खांद्यावर गरुडटक्के होते. चोपदारही होते. प्रदक्षिणेनंतर सायंकाळी सोहळा इनामदार वाड्यात मुक्कामी पोचला. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने देऊळवाड्यात फुलांची आकर्षक सजावट राजगुरुनगर येथील ढोरे बंधू यांच्या वतीने करण्यात आली होती.

आज आकुर्डीत मुक्काम
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. २९) इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. अनगडशाह बाबा यांच्या दर्गाजवळ अभंग, आरती होईल, तसेच चिंचोली पादुका येथे अभंग, आरती होईल. निगडीत दुपारी भोजन करून पालखी सोहळा रात्री आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. देऊळवाडा आणि परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *