Demat Account: डिमॅट खात्यासंदर्भात सेबीकडून मोठा बदल, गुंतवणुकीची मर्यादा वाढली, जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। शेअर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. छोट्या रकमेने शेअर खरेदी करून भांडवल बाजारात उतरू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक सेबीने वैयक्तिक प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खात्यातील (बीएसडीए) मर्यादा वार्षिक १० लाख रुपये केली आहे. सध्याची मर्यादा या खात्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये आहे. यासाठी सेबीने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वार्षिक वाढीव मर्यादा प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खात्यासाठी १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खात्यातील मर्यादा दोन लाख रुपयांवरून १० लाख रुपयांवर नेण्यात येणार आहे. याचा अर्थ, संबंधित डिमॅट खातेधारकाला एका अर्थिक वर्षात १० लाख रुपयांपर्यंत रोखे व्यवहार करता येतील, असे सेबीने एका परिपत्रकात नमूद केले आहे. प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खात्यातील व्यवहार रकमेची मर्यादा वाढवल्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना रोखे व्यवहार अधिक प्रमाणात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे सेबीचे म्हणणे आहे.

प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खात्यामध्ये चार लाख रुपयांचा पोर्टफोलिओ असेल तर त्या खात्यासाठी देखभाल शुल्क लागू होणार नाही. चार लाख ते १० लाख रुपये पोर्टपोलिओ असेल तर देखभाल शुल्क १०० रुपये आकारण्यात येईल. समजा, या गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ १० लाख रुपयांवर गेला तर आपोआपच प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खात्याचे रूपांतर नियमित डिमॅट खात्यात होईल, असे सेबीने सांगितले आहे.

प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खाते
प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खाते किंवा बीएसडीए हे नियमित डिमॅट खात्याचे प्राथमिक रूप आहे. प्राथमिक डिमॅट खाते सेबीने सन २०१२मध्ये आणले. त्यावेळी या खातेदाराला वार्षिक दोन लाख रुपयांचे रोखे व्यवहार करण्याची मुभा होती. प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खाते आणल्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना द्यावे लागणारे डिमॅट शुल्क सेबीला कमी करता आले आहे. एकमेव डिमॅट खाते उघडले असेल किंवा या खात्याचा प्रथम मालक स्वतः गुंतवणूकदारच असेल तर त्याला प्राथमिक सर्व्हिस डिमॅट खाते उघडता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *