विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांनी थेट सांगितलं!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागला आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. योग्य उमेदवारांची निवड करण्यापासून ते आघाडी आणि युतीच्या राजकारणात जागावाटप यावर आता पक्षांपक्षात चर्चा चालू झाल्या आहेत. आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. असे असतानाच महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? या प्रश्नावर खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (29 जून) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

…तर राज्यात सत्ताबदल होणारच
लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये ही निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या 288 पैकी साधारण 155 मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे आहेत. महाराष्ट्रातील जनतेने संकेत दिले आहे. 155 जागांवर आम्ही पुढे आहोत म्हणजेच आमचे बहुमत आहे. अशीच स्थिती जर विधानसभा निवडणुकीतही राहिली तर राज्यात सत्ता बदल होणारच आहे. या सत्ताबदललाला अनुकूल अशी स्थिती आहे, असे आमचे मत आहे.

…म्हणून मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात
विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच परिस्थिती राहील असे मला वाटते. लोकसभा निवडणुकीतून लोकांची मानसिकता स्पष्ट झाली आहे. लोक मोदींच्या कारभारावर खुश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा गॅरंटी देत होते. पण ही गॅरंटी चालली नाही. भाजपचा सबंध प्रचाराचा भार मोदी यांच्यावर होता. मोदीनी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्यातील 14 जागांवर भाजपचा पराभव झाला. म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.

सहकारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न
आम्ही विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत डावे पक्ष, आप, शेतकरी कामगार पक्ष यांनी मदत केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असो पवार यांनी स्पष्ट केले.

सामूहिक नेतृत्त्व हाच आमचा चेहरा
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसताना विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. सामूहिक नेतृत्त्व हेच आमचे सूत्र आहे, असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना सामूहिक नेतृत्त्व हा आमचा चेहरा आहे, असे शरद पावर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *