₹५५५ रुपयांत ₹१० लाखांचा विमा; Post Office ची परवडणारी पॉलिसी, काय आहे खास?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) नुकतेच परवडणाऱ्या प्रीमियममध्ये नवीन पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर सादर केलं आहे. हेल्थ प्लस आणि एक्सप्रेस हेल्थ प्लस अशी त्यांची नावं आहेत. सर्व पर्सनल अॅक्सिडेट कव्हरसाठी पॉलिसी कालावधी एक वर्ष आहे. १८ ते ६५ वयोगटातील कोणीही या कव्हरची निवड करू शकतो. हे कव्हर अपघातामुळे मृत्यू, अपंगत्व आणि वैद्यकीय खर्च यासारख्या आर्थिक जोखमींपासून संरक्षण प्रदान करतात.

हेल्थ प्लस ऑप्शनचे फीचर्स
हेल्थ प्लस योजना तीन पर्यायांमध्ये येते, जी विम्याची रक्कम आणि प्रीमियमच्या आधारे भिन्न आहेत. अपघाती मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आल्यास कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे ‘हेल्थ प्लस ऑप्शन १’. यामध्ये ५ लाख रुपयांची विम्याची रक्कम दिली जाते. तर मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी व वैयक्तिक अपंगत्व आल्यास विमाधारकाच्या कुटुंबीयांना विम्याच्या रकमेच्या १०० टक्के रक्कम मिळणार आहे. पॉलिसीमध्ये दिलेल्या अटींनुसार फ्रॅक्चर झाल्यास २५,००० रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. तसंच मुलांच्या लग्नासाठी ५०,००० रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळतं. हेल्थ प्लस ऑप्शन १ चा वार्षिक प्रीमियम करासह ३५५ रुपये आहे.

हेल्थ प्लस ऑप्शन २ चे फीचर
हेल्थ प्लस ऑप्शन २ मध्ये १० लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. यात मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी व वैयक्तिक अपंगत्व आल्यास विमाधारकाच्या कुटुंबीयांना विम्याच्या रकमेच्या १००% रक्कम मिळेल. पॉलिसीमध्ये दिलेल्या अटींनुसार, फ्रॅक्चर झाल्यास २५,००० रुपयांची विमा रक्कम मिळेल. विमाधारकाला कोमात गेल्यास तीन महिन्यांपर्यंत वजावटीचा लाभ मिळेल. अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी सुमारे पाच हजार रुपये खर्च करता येतो. हेल्थ प्लस ऑप्शन २ मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ५०,००० रुपयांपर्यंत रक्कम असेल. हेल्थ प्लस ऑप्शन २ चा वार्षिक प्रीमियम करासह ५५५ रुपये आहे.

हेल्थ प्लस ऑप्शन ३ चे फीचर
हेल्थ प्लस ऑप्शन ३ तीन पर्यायांपैकी सर्वात व्यापक कव्हरेज प्रदान करते. यात १५ लाख रुपयांच्या विमा रकमेचा समावेश आहे. मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी व वैयक्तिक अपंगत्व आल्यास विमाधारकाला विम्याच्या रकमेच्या १००% रक्कम मिळेल. पॉलिसीमध्ये दिलेल्या अटींनुसार, फ्रॅक्चर झाल्यास २५,००० रुपयांची विमा रक्कम मिळेल. मुलांच्या लग्नासाठी १ लाख रुपयांपर्यंतचं कव्हरेज मिळतं. इतर सर्व फायदे हेल्थ प्लस ऑप्शन २ सारखेच असतील. हेल्थ प्लस ऑप्शन ३ चा वार्षिक प्रीमियम करासह ७५५ रुपये आहे.

एक्सप्रेस हेल्थ प्लानमध्ये काय?
एक्सप्रेस हेल्थ प्लॅन अंतर्गत विमाधारक टेलिकन्सल्टेशन, वार्षिक आरोग्य तपासणी आणि इतर लाभांचा समावेश होतो. हेल्थ प्लस पर्यायाच्या इतर सर्व फायद्यांचाही यात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. हेल्थ प्लस आणि एक्सप्रेस हेल्थ प्लस पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरबद्दल विचारपूस करण्यासाठी इच्छुक व्यक्ती त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकतात. कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी लाभ आणि करांसह संपूर्ण माहितीसाठी पॉलिसीची कागदपत्रे नीट वाचणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *