महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला खरा, पण दोन मोठे धक्के बसले आहेत. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने वर्ल्ड कप जिंकताच निवृत्ती जाहीर केले होती. त्यानंतर आता विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलंय.
काय म्हणाला रोहित शर्मा?
मी जेव्हापासून हा फॉरमॅट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला खूप आनंद मिळत आहे. या फॉरमॅटला निरोप देण्याची उत्तम वेळ आहे. मला यातील प्रत्येक क्षण आवडला आहे. हा माझा शेवटचा खेळही होता आणि मला हेच हवं होतं की मला वर्ल्ड कप जिंकायचा होता. ते स्वप्न आता पूर्ण झालंय, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
माझ्या संघात असे खेळाडू मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे, जे खेळाडू माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी खेळत आहेत ते खरोखर चांगले आहेत आणि मी त्यांचा आभारी आहे, असंही रोहितने म्हटलं आहे. भारतासाठी खेळ जिंकणं, भारतासाठी ट्रॉफी जिंकणं, याचीच मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.
काय म्हणाला विराट कोहली?
सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने बोलताना चाहत्यांना धक्का दिला. हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता. पराभव झाला असता तरी मी निवृत्ती जाहीर केली असती. आता पुढच्या पिढीच्या हातात जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी बराच वेळ लागला. कारण रोहितला नऊ वर्ल्ड कप वाट पाहावी लागली, माझा तर हा सहावाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे रोहित शर्मा वर्ल्ड कपसाठी खऱ्या अर्थाने पात्र होता, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.
भारताकडून खेळणारा हा माझा शेवटचा टी-20 सामना होता. आम्हाला तो कप उचलायचा होता आणि आम्ही ते करून दाखवलं. मी कोणत्या प्रकारच्या मानसिकता आहे, हे मला माहीत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मला फारसा आत्मविश्वास नव्हता. पण आम्ही करून दाखवलं, असं विराट म्हणाला.