महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या सकाळी ६ वाजता एलपीजी सिलिंडरची किंमत अपडेट करतात. आजही एलपीजीचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. जुलैमध्ये तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. तुमच्या शहरात व्यावसायिक सिलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला जाणून घेऊया.
एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला
महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज महिन्याची पहिली तारीख असून आजच्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुधारणा केली जाते. अशा स्थितीत, सोमवारी १ जुलै रोजी इंडियन ऑइल, एचपीसीएल आणि बीपीसीएलने एलपीजी सिलिंडरचा भाव कमी करण्याची घोषणा केली आहे. होय, या कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर ३० रुपयांनी कमी केला असून १ जुलैच्या सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत.
महिन्याच्या पहिल्याच तारखेला आली गुड न्यूज
इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक गॅसचा भाव आता ३० रुपयांनी कमी झाला आहे तर घरगुती सिलिंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. मार्चमध्ये महिला दिनानिमित्त घरगुती गॅसचा दर कमी करण्यात आला होता. ९ मार्च २०२४ रोजी घरगुती गॅसचा दर बदलला आणि प्रति गॅस १०० रुपयांनी कमी झाला होता. त्यामुळे आता मुंबईत घरगुती गॅसचा दर ८०२.५० रुपये तर दिल्लीत ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचवेळी, उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस आणखी स्वस्त झाला.