महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। राज्यभरात जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केल्याचं चित्र आहे. राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे. तर आज साताऱ्यातील घाटमाथ्यावरील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे शहर परिसरात सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे, पुणे जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जून महिन्यात विदर्भात पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात ही पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमधील दहादेवाडी मंडलात १४५.३ मिलिमीटर तर यवतमाळमधील जवळा मंडलात १२८.५ मिलिमीटर पाऊस पडला. या मुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असल्याचे दिसून येत असून खरिपातील पिकांना दिलासा मिळाला.
राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. तर वाशीम, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आहे. विदर्भात सुरुवातीपासून पाऊस प्रमाण कमी राहिला आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून पोषक हवामान तयार झाल्याने दोन दिवसांपासून भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांत बऱ्यापैकी पाऊस पडत आहे.
त्यानंतर यवतमाळ, वर्धा भागात पावसाचा जोर वाढला आहे. यवतमाळमधील कळगाव, तूपटाकळी मंडलात ११६.३ मिलिमीटर, तर मालखेड १११.३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचले होते. पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना नवसंजीवनी मिळाली. कोकणातही मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही वेळा पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी सिंधुदुर्ग. पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगला पाऊस ?
जन महिन्यात पावसाव्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत असून, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत असले तरी कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज सोमवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला.