महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम मंगळवारी लोणी काळभोरला असेल, तर माऊलींची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.
पंढरीच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम उरकून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे. पहाटेची आरती झाल्यानंतर संतांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या रथावर ठेवण्यात आल्या.
मुक्काम
भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात ज्ञानोबांचा तर निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबारायांचा मुक्काम होता. आषाढी वारीसाठी निघालेल्या संतजनांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या.
वारकरी
पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी आणि त्यांना निरोप देण्यासाठी गोळा झालेले पुणेकर याप्रसंगी भक्ती रसात न्हाऊन निघाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला होता.
दिंड्या
पालखी सोहळ्यात दाखल झालेल्या हजारो दिंड्या शहराच्या विविध भागात विखुरल्या होत्या. त्या मंगळवारी पुन्हा एकवटल्या आणि पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्या.
ज्ञानोबा
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम लोणी काळभोरला असणार आहे. तर ज्ञानोबांची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.
दिवेघाटाचा प्रवास
दरम्यान, हिरवाईने नटलेल्या दिवे घाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो, यंदाही हीच पर्वणी अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी हा घाट ओलांडणार आहेत. ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष आणि विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचा भक्ती सागर पुढच्या गावी जाऊन विसावतो.