MLC Election :विधान परिषदेवर भाजपचे हे दोन चेहरे : विधानसभेसाठी आता अजितदादांचे दोन मोहरे?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या यादीत समाजिक संतुलन साधतानाच पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांच्या आमदारांच्या संख्येत प्रत्येकी एकाने भर पडली आहे. पुण्यातून हडपसरमधून योगेश टिळेकर यांच्या रूपाने इतर मागासवर्गाचा चेहरा पुढे करण्यात आला आहे, तर पिंपरीमधील अमित गोरखे यांच्याद्वारे मातंग समाजाला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनुक्रमे पिंपरी व हडपसर हे विधानसभा मतदारसंघ महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता वाढली आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत आज, मंगळवारी (दोन जुलै) समाप्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पाच उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके यांच्यासह पुण्यातील योगेश टिळेकर आणि पिंपरी-चिंचवडमधील अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रुपाने मित्र पक्ष रयत क्रांती संघटनेला संधी मिळाली आहे.

हडपसरमधील माजी आमदार योगेश टिळेकर यांनी भाजपच्या युवा शाखेचे; तसेच ओबीसी आघाडीचे प्रमुखपद सांभाळले आहे. इतर मागासवर्गातील मतदारांनी भाजपला वेळोवेळी मोठा आधार दिला आहे. टिळेकर प्रतिनिधित्व करीत असलेल्या माळी समाजाचा या भागात प्रभाव आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर मतदारसंघात असून, शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी माळी समाज उभा राहिल्याचे दिसले आहे. त्या पार्श्वभूमीवर या समाजाला जवळ घेण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

हडपसर मित्रपक्षाला सुटण्याची शक्यता
विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या टिळेकर यांना परिषदेवर संधी मिळाल्याने हा मतदारसंघ मित्रपक्षाला सुटण्याची शक्यता बळावली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आमदार असल्याने राष्ट्रवादी या मतदारसंघावर दावा सांगत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नाना भानगिरे यांच्यासाठी वजन टाकणार का, याबाबतही उत्सुकता आहे. शरद पवार गटाकडून येथे प्रशांत जगताप आणि ठाकरे गटाकडून महादेव बाबर इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत येथील निकालावर परिणाम करणारे आणि ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने लोकसभा निवडणूक लढविणारे वसंत मोरे विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिल्यास समीकरणे बदलू शकतात.

पिंपरीतही ‘सोशल इंजिनीअरिंग’
पिंपरीत अमित गोरखे यांना परिषदेवर संधी देऊन भाजपने मातंग समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. भाजपच्या वतीने पिंपरीतील इच्छुकांमध्ये गोरखे यांचाही समावेश होता. त्यांना परिषदेवर संधी मिळाल्याने महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा या मतदारसंघावरील दावा भक्कम झाल्याचे बोलले जात आहे. पिंपरीत ठाकरे गटाकडून माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि सचिन भोसले, शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत यांची नावे असून, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे याही तयारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *