चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? लाहोरमध्ये 1 मार्चला सामना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। टी20 विश्वचषकानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. एक मार्च 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. यावेळचे चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडणार आहे. टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या परवानगीनंतरच भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबतचा निर्णय होणार आहे. दोन दशकांपासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. आशिया चषकावेळीही असाच तिढा झाला होता, त्यावेळी हायबर मॉडेलनुसार सामने घेण्यात आले. पण यावेळी आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेय. पण सुत्रांच्या वृत्तानुसार, पीसीबीने भारत आणि पाकिस्तान सामन्याचं आयोजन लाहोरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक मार्च रोजी लाहोर येथे आमना सामना होणार आहे. पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च यादरम्यान होणार आहे. 10 मार्च रोजी राखीव दिवस ठेवण्यात आली आहे. 9 मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीसाठी पीसीबीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये?
मिडिया रिपोर्टनुसार, पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी हे टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यासाठी बार्बाडोसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 15 सामन्याचे वेळापत्रक आयसीसीकडे दिलेय. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लाहोरमध्ये सात सामने खेळवले जाणार आहेत. तीन सामने कराचीत होणार आहेत. यासोबतच रावळपिंडीत पाच सामने खेळवले जाणार आहेत.

लाहोरमध्ये फायनलचा थरार –
चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना कराची येथील स्टेडिमयमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. उपांत्य फेरीचे सामन्याचे यजमानपद रावळपिंडी आणि कराचीला मिळेल. फायनलचा थरार लाहोरच्या मैदानात होणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवण्याचा निर्णय पीसीबीने घेतल्याचं मिडिया रिपोर्ट्समधून समोर आलेय.

ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान –
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामधील ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना ठेवण्यात आलेय. त्याशिवाय ग्रुप ए मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड या संघांना ठेवण्यात आलेय. तर ग्रुप ब मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे दोन संघ उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *