महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। James Anderson Last Match: इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. सध्या वेस्ट इंडिज संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना १० जुलैपासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. हा सामना अँडरसनचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या सामन्यातून इंग्लंडकडून दोन खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहेत. यामध्ये गस अटकिन्सन आणि जॅमी स्मिथ या दोन खेळाडूंचा समावेश आहे.
याशिवाय युवा फिरकीपटू शोएब बशीरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सलाही ऍशेस मालिकेनंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे.
याशिवाय सलामीसाठी झॅक क्रावली आणि बेन डकेट यांना संधी मिळाली असून ऑली पोपलाही संधी मिळाली आहे.
त्याचबरोबर जो रुट, हॅरी ब्रुक हे देखील फलंदाजी फळीत असून कर्णधार बेन स्टोक्सही फलंदाजी आणि गोलंदाजीत मोलाचे योगदान देऊ शकतो. मात्र, जॉनी बेअरस्टो आणि बेन फोक्स यांना संधी मिळालेली नाही. जॅमी स्मिथ यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळेल.
One man playing his 188th Test ????
Two men playing their first ????Our Test XI to take on the West Indies is here ????
— England Cricket (@englandcricket) July 8, 2024
अँडरसन मोडू शकतो वॉर्नचा विक्रम
अँडरसन त्याच्या शेवटच्या सामन्यात शेन वॉर्नचा विक्रम मोडू शकतो. अँडरसनने १८७ सामन्यांत ७०० कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वॉर्नने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.
त्यामुळे अँडरसनने जर ९ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वॉर्नला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर येईल. या यादीत अव्वल क्रमांकावर ८०० विकेट्ससह मुथय्या मुरलीधरन आहे.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस अटकिन्सन, शोएब बाशीर, जेम्स अँडरसन