महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। बाजारात वाढलेले टॉमेटोचे भाव कमी झाले असले तरी दुसरीकडे लसणाने ३०० रुपयांचा दर गाठला आहे. यामुळे फोडणीला लसणाच्या महागाईचा तडका द्यावा लागत आहे. एखाद्यावेळी टोमॅटो खरेदी केले नाही तरी चालते पण फोडणीसाठी लसूण हा पाहिजेच आणि फोडणीशिवाय शेवटी भाजीही अळणीच यामुळे महाग असला तरी लसणाच्या विक्रीत फरक पडलेला नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
एप्रिल, मे महिन्यात खराब हवामान, अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागल्याने नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब झाला.
तसेच मध्य प्रदेशातंनही राज्यात मोठ्या प्रमाणात लसणाची आवक होते ही आवकही कमी असल्याने लसणाचे भाव चढे राहिले. तीन महिन्यांपासून लसणाचे दरात चढ-उतार असून लहान लसूण २५० रूपये किलोपासून आहे तर देशी लसूण ३२० रुपये किलो आहे. सध्या बाजारात उत्तम प्रतीचा लसूण ३२० रुपये किलो असल्याचे व्यापारी जे. डब्लू. खामकर यांनी सांगितले.