महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। महायुती सरकारने पराभवाच्या भीतीने दररोज नवीन नवीन योजनांचा सपाटा सुरू केला आहे. राज्यावर संकट असताना उपाययोजना नव्हत्या. रोजगाराच्या नावावर फसवणूक सुरू आहे. बेरोजगार त्रस्त आहेत. कर्नाटक सरकारने रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचा कायदा केला आहे.
पण महाराष्ट्रात नियम आहे. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करा, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे युवक रस्त्यावर आला आहे. ६०० जागांसाठी २५ हजारावर तरुण लाइनमध्ये उभे असतात. बेरोजगारांची होणारी होरपळ थांबविण्यासाठी ठोस उपाय योजण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याचा समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता मात्र लाडका भाऊ योजना सुरू करण्यात येत आहे.
विशालगडावरील घटनेबाबत ते म्हणाले, सरकार सुपारी घेऊन काम करत आहे. गावाचा संबंध नसताना नालायक लोकांनी हैदोस घातला. सिलिंडर स्फोट केला. घर उडवले. याला सरकार जबाबदार आहे. ५० मीटरवर पोलिस अधिक्षक पांडे थांबले होते. त्यांनी लाठीमार करण्याचा इशारा दिला. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांवर कारवाई करावी व या घटनेचा मास्टर माईंड कोण याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडी होणारच
विधानसभेसाठी सगळेच पक्ष चाचपणी करत आहेत. काँग्रेसनेही केली आहे. मात्र, कुणी कितीही आडकाठी आणली तरी महाविकास आघाडी होणारच आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करणार कसे, अनेकांना शब्द दिले आहेत. गुलाबाचे झाड आहे आणि काटे नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचा टोला त्यांनी लगावला.