राज्यात १५ दिवसांत सापडले झिकाचे २० रुग्ण, ‘अशी’ घ्या काळजी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। राज्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असताना झिकाच्या रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होत आहे. जुलैच्या १५ दिवसांत राज्यात झिकाचे २० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या २८ झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत.

राज्यात जाानेवारीपासून आतापर्यंत झिकाचे २८ रुग्ण सापडले आहेत. त्यातील मे महिन्यात दोन रुग्ण तर जूनमध्ये ६ रुग्ण सापडले आहेत. मात्र मागील १५ दिवसांत राज्यात झिकाचे २० रुग्ण सापडले आहेत. मे महिन्यात कोल्हापूर व संगमनेरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. मात्र जूनमध्ये पुण्यात सहा रुग्ण सापडले आहेत. जुलैत झिकाचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात सापडले. आतापर्यंत सापडलेल्या २८ रुग्णांपैकी २४ रुग्ण हे पुणे शहरात सापडले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि मुळशी तालुक्यात प्रत्येकी एक असे दोन रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरात सापडलेल्या २४ रुग्णांमध्ये १० गर्भवती महिलांना झिकाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

झिकाला प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील ४७ हजार ५१५ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात ३८९ नागरिकांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले. तसेच ३४७ गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

काय काळजी घ्याल?
झिका हा डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा एडिस डासांद्वारे पसरतो. या आजारात रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, तसेच मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, कोणताही ताप अंगावर काढू नये. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात दाखवावे. घरातील पाणी साठे वाहते करावेत. साठवलेल्या पाण्यांची भांडी कापडाने झाकून घ्यावीत. पाणी रिकामे करता येणार नाही अशा साठ्यांमध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा. मच्छरदाणीचा वापर करावा. दिवसा पूर्ण कपड्यांत राहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण तयार करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *