Tomato Price Hike : लसणानंतर आता टोमॅटो कापणार सामान्य माणसांचा खिसा ; उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९जुलै ।। दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशात पुन्हा एकदा सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागणार आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे महिलांच्या किचनचं बजेट देखील गडबडलं आहे. मुंबईतील भाजी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर ७०-९० रूपये किलोच्या घरात पोहचले आहेत. तर किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये किलोने देखील विकला जात आहे.

टोमॅटो महाग होण्याचं कारण काय?

आवक घटल्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर अशा अनेक ठिकाणी ही दरवाढ झालीये. महागाईमध्ये सतत भाज्यांची होत असलेली दरवाढ आम्हाला परवडत नाही अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिलीत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्यातील सर्वच बाजारपेठेत टोमॅटोचे दर वाढले आहेत. अजून पुढचा एक महिना हे दर असेच कायम वाढलेले राहणार अशी शक्यता आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात टोमॅटोंचा तुटवडा पडलाय. त्यामुळे राज्यभर दरवाढ होताना दिसतेय. असे असले तरी मुंबईतील काही बाजारात टोमॅटोचा दर अद्यापही ६०-७० रुपये किलो इतका आहे.

टोमॅटोसह पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. जुलै महिना आता आर्धा संपत आला तरी अद्याप काही ठिकाणी पाऊस हवा तसा बरसत नाहीये. त्यामुळे काही ठिकाणी पिके पाण्याअभावी जळून गेल्याचं चित्र आहे.

अशात नाशिकच्या येवला शहरासह ग्रामीण भागात काल दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे, एक तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांसह इतर शेती पिकांना जीवदान मिळालेय. ही सर्व परिस्थिती पाहता, टोमॅटोचे उत्पादन वाढल्याशिवाय भाव उतरणार नाहीत अशी चिन्हे आहेत.

शेतकऱ्याने शिमला मिरची फेकली रस्त्यावर

शिमला मिरचीला भाव नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने मिरची रस्त्यावर फेकली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली आहे. शिमला मिरचीला केवळ ५ रुपये भाव मिळाल्याने येण्याजाण्याचाही खर्च निघाला नसल्यानं शेतकरी हतबल झालेत. त्यामुळे शेतकऱ्याने सिल्लोडच्या बुलढाणा – अजिंठा महामार्गावर शेतातील शिमला मिरची फेकून दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *