महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९जुलै ।। एकीकडे महिलांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू होत असताना श्रीलंकेतील कोलंबो शहरात आयसीसीची महत्त्वाची वार्षिक परिषद सुरू होत आहे. विद्यमान कार्याध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाल संपण्याअगोदरच बीसीसीआयचे सचिव जय शहा हे पद स्वीकारणार का, याची चर्चा या बैठकीत होऊ शकते.
आयसीसीचे ही वार्षिक परिषद चार दिवसांची आहे. सर्वात मोठा चर्चेचा विषय ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील अमेरिकेत खेळवण्यात आलेल्या सामन्यातील नुकसानीचा असणार आहे. जवळपास दोन कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या बैठकीत नऊ मुद्यांचा अजेंडा आहे. त्यात टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील आर्थिक अहवालाचा थेट समावेश नाही; परंतु स्पर्धेनंतरचा अहवाल जाहीर करून त्यावर चर्चा करण्याची प्रथा असल्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. आयसीसीच्या अंतर्गत लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, नव्या सदस्य देशांची नोंदणी, संलग्न संघटनांचे अहवाल आणि बक्षीस, पुरस्कार सोहळे, असेही काही मुद्दे असणार आहेत.
पाकिस्तानमध्ये नियोजित असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकमध्ये जाणार का, ही आणखी एक महत्त्वाची घटना आहे; परंतु हा विषय चर्चा पटलावर नाही, मात्र अध्यक्षांच्या परवानगीने हा विषय चर्चेस येऊ शकतो. पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून तसे प्रयत्न केले जातील.
जय शहा आता आयसीसीचे सूत्रे स्वीकारतील, अशी जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. बीसीसीआय सचिव म्हणून त्याचे एक वर्ष शिल्लक आहे. २०२५ पासून त्यांचा बीसीसीआयमधील कुलींक कालावधी सुरू होईल. २०२५ मध्ये त्यांनी आयसीसी कार्याध्यक्षपदाची सूत्रे घेतली तर विद्यमान कार्याध्यक्ष बार्कले त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. डिसेंबर २०२४ ते डिसेंबर २०२६ असा बार्कले यांचा कार्यकाळ आहे.