Weather Forecast : महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; हवामान खात्याकडून सतर्कतेच्या सूचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। संपूर्ण देशासह महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान, पुढील ३ दिवस पावसाची अशीच परिस्थिती कायम राहणार, हवामान खात्याने आज १३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी भागात पावसाची संततधार कायम राहिल.

विदर्भात पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह (Heavy Rain Alert) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट असल्यामुळे नागरिकांना झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही देण्यात आलाय.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीतील पावसाची स्थिती बघता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

दुसरीकडे मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार कायम राहणार असून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ या भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनारी तसेच घाटमाथ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *