महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला ऑफर दिली होती, असा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केला होता. फडणवीस यांची ऑफर घेऊन येणारा व्यक्ती कोण? याबाबत देखील देशमुखांनी खुलासा केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देखमुख यांनी दावा केलाय की, ”प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम याला त्यांच्याकडे पाठवलं होतं. समित कदम हा सांगलीच्या मिरजमधील नेता आहे. तो जनसुराज्य शक्ती पार्टीचा अध्यक्ष आहे. तोच माझ्या निवासस्थानी आणि घरी आला होता. फडणवीस यांना तुमच्याशी बोलायचं आहे, असं तो म्हणाला होता.”
देखमुखांनी सांगितलं की, ”सचित कदमने त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. तो मला पाच ते सहावेळा भेटला. मी फडणवीसांचे मेसेज घेऊन आलोय असं तो म्हणाला होता. त्याने एका लिफाफ्यामध्ये प्रतिज्ञापत्र आणले होते. त्याच्यासोबत भेटीचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत.मी योग्य वेळेला यासंदर्भातील रिकॉर्डिंग जाहीर करेन.”
देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली प्रतिक्रिया दिली?
टाइम्स ऑफ इंडियाकडून देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी एसएमएसच्या माध्यामातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की, ”अनिल देखमुख हे खोटं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आधी पुरावे देऊ द्या. त्यानंतर मी माझ्याकडे असणारे त्यांचे सर्व क्लिप सार्वजनिक करतो.”
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अनिल देशमुख यानी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना यांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी मला चार प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला होता, असं ते म्हणाले होते.