Sharad Pawar : पुण्याचा वाढता विस्तार, नवीन महापालिकेची तातडीने गरज, शरद पवार यांची भूमिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। पुण्याचा वाढता विस्तार आणि नवीन गावांच्या समावेशामुळे शहरात स्वतंत्र महापालिकेची तातडीने गरज असताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहरातील दुसऱ्या महापालिकेची भूमिका रविवारी पहिल्यांदाच जाहीरपणे मांडली. ‘लोकसंख्येचा वाढता ताण ही पुण्यावरील भविष्यातील मोठी समस्या होऊ शकते. येत्या काळात हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे,’ असे सूचक विधान पवार यांनी केले. पवार यांच्या सूचनेमुळे नवीन महापालिकेची गरज अधोरेखित झाली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे पुणे महापालिकेच्या यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने नागरिकांना किमान प्राथमिक सुविधा पुरविण्यासही यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यात दोन वर्षांपासून एकही महापालिका अस्तित्वात नसल्याने सर्व कारभार राज्य सरकारच्या हाती आहे. पुण्यासाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. ‘हडपसर’ अशी नवी महापालिका स्थापन करावी, अशी आग्रही भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने मांडली आहे. शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडल्याने नवीन महापालिकेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रयत्न करण्याचे आश्वासन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या वानवडी येथील कार्यालयाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली. ‘लोकसंख्येचा वाढता ताण ही पुण्यावरील भविष्यातील मोठी समस्या होऊ शकते. येत्या काळात हडपसर-हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे,’ असे सूचक विधान पवार यांनी त्या वेळी केले. ‘हडपसर-हवेलीमधील नागरिकांचे मत जाणून मी या महापालिकेसाठी नक्की प्रयत्न करीन,’ असे आश्वासन त्यांनी दिले.

पूर्व पुण्याच्या विकासामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हडपसर येथील मगरपट्टा सिटी, अॅमेनोरा, सीरम कंपनी, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहत, खराडी येथील ‘आयटी पार्क’ अशा मोठ्या प्रकल्पांना पवार यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागासाठी स्वतंत्र महापालिकेची गरज अधोरेखित करून या विषयाला वाचा फोडली आहे. दरम्यान, उरुळी आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी नगर परिषद करण्याऐवजी पुण्याच्या पूर्वेकडील आणखी गावांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *