महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड हे बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. पण एकेकाळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या जीवघेण्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणारा हा दिग्गज फलंदाज जीवनाची लढाई हरला. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी अंशुमन गायकवाड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि भारतीय क्रिकेटसाठी हा धक्का असल्याचे म्हटले.
1970-80 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार सुरू होते. माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी बीसीसीआयकडे त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. यानंतर 14 जुलै रोजी बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली होती.
My deepest condolences to the family and friends of Mr Aunshuman Gaekwad. Heartbreaking for the entire cricket fraternity. May his soul rest in peace🙏
— Jay Shah (@JayShah) July 31, 2024
लंडनमधील उपचारानंतर गायकवाड गेल्या महिन्यातच मायदेशी परतले होते आणि मुंबईत त्यांच्या घरी राहत होते. बुधवार, 31 जुलै रोजी वयाच्या 71 व्या वर्षी या आजारामुळे त्यांचे येथे निधन झाले. गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त कळताच भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गायकवाड यांचे निधन संपूर्ण क्रिकेटसाठी दु:खद असल्याचे वर्णन करून शाह यांनी त्यांचे कुटुंब आणि मित्रांप्रती शोक व्यक्त केला आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.