महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। कोणत्याही दंडाशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आता संपली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही करदात्यांना गेल्या वार्षिकच्या कमाईचे विवरण देण्यासाठी ३१ जुलैची डेडलाइन देण्यात आली होती जी आता संपली आहे. अशा स्थितीत आता उशिरा किंवा विलंबित आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांना निर्धारित दंड भरणे अनिवार्य असेल. दरवर्षी करदात्यांसाठी डोकेदुखी ठरणारी टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख निघून गेली असली तरी आयकर विभाग काही करदात्यांना ३१ जुलैनंतरही रिटर्न भरण्याची स्वतंत्र मुदतही देतो.
विलंबित आयटीआर भरण्यासाठी किती दंड द्यावा लागेल?
बिलेटेड किंवा विलंबित ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे पण, उशिरा आयटीआर दाखल करणाऱ्यांना आयकर विभाग व्याज देत नाही. जर तुम्ही आयटीआर वेळेवर भरला तर करदात्याला रिफंडच्या रकमेवर दरमहा ०.५% दराने व्याज मिळते. याउलट आता वैयक्तिक करदात्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आणि देय तारखेनंतर आयटीआर फाइल केला तर त्याला ५,००० रुपयांपर्यंत विलंब शुल्क भरावे लागेल. त्याचवेळी, वार्षिक कमाई पाच लाखांपेक्षा कमी असेल तर विलंब शुल्क म्हणून १,००० रुपये भरावे लागतील.
दंडाशिवाय ITR भरण्याचे स्वातंत्र्य
खात्यांचे ऑडिट आवश्यक असलेले व्यक्ती किंवा व्यावसायिकांना आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत इतरांपेक्षा वेगळी आहे. असे लोक ३१ ऑक्टोबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकतात. आयकर विभागाकडून अशा लोकांना तीन महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली जाते जेणेकरून एखाद्या मान्यताप्राप्त CA कडून ऑडिट करून त्यानंतर त्यांचा आयटीआर दाखल करू शकतील.
कोणाला ३० नोव्हेंबरपर्यंत मुभा
दुसरीकडे, विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांसाठी आयटीआर भरण्यातही सूट दिली जाते. एखाद्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये हस्तांतरण किंमत अहवाल फाइल करणे आवश्यक असेल तर आयटीआर फाइल करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिली जाते. आयकर विभागानुसार असे लोक ३० नोव्हेंबरपर्यंत रिटर्न फाईल करू शकतात. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांव्यतिरिक्त काही देशांतर्गत व्यवहारांमध्येही अशा सूटचा लाभ मिळतो.