महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून आज मोठी बातमी समोर आली. विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातून अपात्र ठरविण्यात आले आहे. ५० किलो फ्री स्टाईल स्पर्धेत यूएसएच्या सारा हिल्डब्रँड विरुद्धच्या कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाटचे वजन १०० ग्रॅमने जास्त आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विनेश फोगाटसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
विनेश फोगाट मंगळवारी फायनलमध्ये गेल्याचे कळताच भारतीयांना प्रचंड आनंद झाला होता. विनेश फोगाट आज संध्याकाळी अंतिम सामना खेळणार होती. आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या सामन्यापूर्वीच विनेशला अपात्र ठरण्यात आल्यामुळे भारतीय नाराज झाले आहेत.
पात्रता आणि उपांत्य फेरीपूर्वी विनेश फोगाट वजनाच्या निकषात बसत होती. पण अंतिम सामन्यापूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे ती रौप्य पदकासाठीही पात्र ठरणार नाहीये. अशामध्ये ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसाठी वजनाचे नेमके नियम कसे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत….
ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसाठी वजनाचे नियम काय आहेत?
– ज्या खेळाडूंमध्ये सामना होणार आहे त्या पैलवानांचे वजन त्या दिवशी सकाळी केले जाते.
– प्रत्येक वजनी गटातील स्पर्धकांचा सामना दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित केला जातो. त्यामुळे जो कुस्तीपटू अंतिम फेरीत किंवा रिपेचेजमध्ये
पोहचेल त्यांना दोन्ही दिवस वजन कमी करावे लागते.
– पहिल्यांदा वजन करताना कुस्तीपटूंना त्यांचे वजन मोजण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी दिला जातो.
– कुस्तीपटूंना पाहिजे तितक्या वेळा वजन करण्याचा अधिकार आहे.
– स्पर्धकांचे वजन त्यांच्या सिंगलेट्सने (कुस्तीपटू घालणारे ड्रेस) केले जाते.
– खेळाडूंमध्ये कोणत्याही संसर्गजन्य रोगाची लक्षणं आहेत की नाही याची देखील तपासणी केली जते.
– खेळाडूंची नखे खूपच कापून छोटी केली जातात.
– दुसऱ्या दिवशी प्रतीस्पर्धी कुस्तीपटूसाठी वजन प्रक्रिया १५ मिनिटे चालते.