महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकमधील कांदा निर्यातीवर (Onion Export) झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे रोजचे 80 ट्रक सीमेवर थांबले आहेत. जर कांद्याचे ट्रक तिथेच अडकून राहिले तर ते खराब होतील. यामुळे व्यापाऱ्यांना करोडोंचं नुकसान होऊ शकतं.
बांगलादेशात हिंसाचार उफाळला असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. घरं, कार्यालयं पेटवली जात असताना सध्या बांगलादेशात जाणं संकटात जाण्यासारखं आहे. केंद्र सरकारही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पावलं उचलत आहे. याचमुळे बांगलादेशला निघालेले हे ट्रक सीमेवर थांबवण्यात आले आहेत. जवळपास 3 हजार टन कांदा या ट्रकमध्ये असल्याची माहिती आहे.
भारतातून दरवर्षी बांगलादेशात कांदा निर्यात केला जातो. 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा बांगलादेशात पाठवण्यात आला होता. भारताच्या प्रमुख आयातदारांपैकी बांगलादेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात सुरु असलेल्या अराजकतेचा परिणाम कांदा निर्यातीवर झाला आहे.
कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेशच्या सीमेवर अडकले आहेत. नाशिकहून रोज 70 पेक्षा जास्त कांद्याचे ट्रक बांगलादेशला रवाना होत असतात. सीमेवरच कांद्याचे ट्रक थांबल्याने व्यापाऱ्यांचे करोडोंचे नुकसान झालं आहे. अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील दरांवर परिणाम?
सध्या राज्यात कांद्याचे भाव स्थिर आहेत. आवक कमी असल्याने सध्या बाजारभाव 2000 ते 2700 पर्यंत आहे. पण जर कांदा निर्यात झाला नाही तर याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होईल. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव गडगडतील ज्यामुळे कांदा शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे केंद्र सरकारने इतर देशांमध्ये अधिक कांदा निर्यातीवर लक्ष द्यावं अशी मागी केली जात आहे.