टोमॅटोच्या दरात मोठी घट, किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। किरकोळ बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. आवक वाढल्याने आठवडाभरात टोमॅटोचे दर निम्माहून कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोपर्यंत आहेत.

टोमॅटोच्या दरात जुलै महिन्यात टप्याटप्याने वाढ होत गेली. मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले होते. नवीन लागवड केलेला टोमॅटो बाजारात उपलब्ध झाला नव्हता. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली होती, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे, मुंबईतील बाजारात पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरातून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविले जातात. घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली होती. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात चार ते पाच हजार पेटी टोमॅटोची आवक व्हायची. पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. टोमॅटोची आवक दुप्पट झाली आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली असून, यापुढील काळात टोमॅटोच्या दरात फारशी वाढ होणार नाही, असे भुजबळ यांनी नमूद केले.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुलै महिन्यात चार ते पाच हजार पेटी टोमॅटोची आवक व्हायची. गेल्या तीन ते चार दिवसांत टोमॅटोची आवक वाढली आहे. सध्या बाजारात दररोज दहा ते बारा हजार पेटी टोमॅटोची आवक होत आहे. टोमॅटोची लागवड चांगली झाली असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. -विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर प्रतवारीनुसार ९० ते १२० रुपये दरम्यान होते. गेल्या चार दिवसांत टोमॅटोची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली. आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली. -प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार

टोमॅटोचे दर
घाऊक बाजार – १०० ते २०० रुपये (दहा किलो)

किरकोळ बाजार- ४० ते ५० रुपये (एक किलो)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *