महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचा टिझर प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सुनील भुसारा हे नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकार घाबरलं आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करताहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, 9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा-2 ही आम्ही सुरू करतोय. जुन्नर पासून यात्रा सुरू होईल. सकाळी 9 वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे. त्यानंतर यात्रा सुरू होईल.
बहुजनांचे सरकार आम्ही आणणार आहोत. त्यासाठी आम्ही जनतेकडे जाणार आहोत. लोकसभेत महायुतीला जनतेने नापसंती दिली. 31 जागा मविआला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू शकतो हे जनतेनं दाखवून दिलं. महाराष्ट्रात जनजागृती करण्याचं आम्ही ठरवलं आहे, असं पाटील म्हणाले.
राज्यातील कायदा सुव्यस्था कशी ढासळली आहे. बेरोजगारी कशी वाढली आहे, हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र कसं मागे गेलं आहे. हे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. सरकारचे काळे कारनामे आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत, असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. आम्ही ज्या ठिकाणी लढणार आहोत अशा मतदारसंघात आम्ही यात्रा काढतोय, असं त्यांनी सांगितलं.