Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना मिळणार 25 हजार रुपये, जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। Pune Flood: पुण्यात काही दिवसांपूर्वी पावसाने हाहाकार माजवला होता. सततच्या पावसामुळे आणि धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणी आता पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पूरग्रस्तांना २५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईचे निकष शिथिल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. अनेकांच्या घरात दोन ते तीन दिवस पाणी साचून होते.

व्यापारी, दुकानकार यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मतदारयादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानधारक दुकानदार यांना नुकसानीच्या ७४ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार जी रक्कम जास्त असेल ती दिली जाणार आहे. टपरीधारकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. शहरात अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे देखील पूराची तीव्रता वाढली होती. ही अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहेत. याशिवाय पूर रेषा देखील नव्याने आखण्यात येणार आहे.

पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपले होते. काही ठिकाणी छातीपर्यंत पाणी साचलं होतं. एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु होतं. काही लोकांना जीव देखील गमावावा लागला होता. अनेकांची घरे उद्धवस्त झाली, घरातलं सर्व वाहून गेलं. अशावेळी त्यांना मदतीची अपेक्षा होती. सध्या प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *