महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भेटण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी दिलेली वागणूक आणि त्यानंतर आरक्षणासंदर्भातून भाष्य करताना राज्यात कोणलाही आरक्षणाची गरज नाही, असं म्हटलं होतं. या प्रकरणानंतर मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना जागोजागी मराठा आंदोलकांकडून विरोध होताना दिसत आहे. असं असतानाच आता या प्रकरणावर मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांना आडवू नये असं आवाहन करताना त्यांनी राज ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
जरांगेंना राज यांच्याबद्दलचा प्रश्न
बीडमध्ये राज यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकून आंदोलकांनी निषेध नोंदवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा ताफा आडवला जात असल्याच्या संदर्भात जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटलांनी, कोणतंही आंदोलन राज्यात सुरु नाही त्यामुळे राज ठाकरेंना आडवू नये असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. मात्र ते करतानाच मनोज जरांगे पाटलांनी, ‘गरज पडली तर मुंबईत जाऊन गचांडी धरुन जाब विचारु,’ असंही ते म्हणालेत. मुंबईत जाऊन मराठ्यांची ताकद काय आहे ते दाखवून देऊ असंही ते म्हणालेत.
जरांगे काय म्हणाले?
“कोणी त्यांना आडवू नका. राज्यात सध्या मराठ्यांचं कोणतंही आंदोलन सुरु नाही. उगाच त्यांना आडवू नका,” अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरेंचा ताफा न आडवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र पुढे बोलताना जरांगेंनी, “मराठ्यांनी आडवायचं ठरवलं, जाब विचारायचं ठरवलं तर मराठे मुंबईत जाऊन गचांडी धरुन यांना जाब विचारु शकतो एवढा विश्वास मला आहे. ते तुम्हाला दिसेल. आता बऱ्याच जणांना मराठ्यांची ताकद कमी झाली की काय? मराठ्यांना पाठिंबा आहे की नाही? मुंबईत सुद्धा किती मराठा आहेत दाखवतो,” असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
राज काय बोलणार?
राज ठाकरे आज दुपारी एक वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदारी विश्रामगृहावर ही पत्रकार परिषद होईल. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. मात्र राज ठाकरेंना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. तसंच बीडमध्येही ठाकरे गटाने राज ठाकरेंचा ताफा अडवला होता. तेव्हा राज ठाकरे या दोन्ही घटनांवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
