सीएनजी आला, ईव्ही आली तरी डिझेल कारची मागणी का घटेना? काय आहे भविष्य…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। इंधन महाग झाले आहे, कारच्या किंमतीही गगनाला जाऊन भिडल्या आहेत. अशामुळे काही लाख जास्त मोजून लोक इलेक्ट्रीक कारकडे वळत आहेत. तरीही काही केल्या डिझेल कारचा खप काही कमी होताना दिसत नाहीय. उलट आता तर जास्त रनिंग असेल तर डिझेल कार हे समीकरणही ईलेक्ट्रीक कारनी मिळविले आहे. मग असे का होतेय, डिझेल कारची मागणी का कमी होत नाहीय….

डिझेलच्या कार जास्त प्रदुषण करतात. म्हणून त्यांचा खप कमी करण्यासाठी सरकारने अव्वाचेसव्वा कर लावले आहेत. तरीही लोक डिझेलच्या कार घेत आहेत. येत्या काळात हळू हळू डिझेलच्या कारचे आकर्षण कमी होईल असा अंदाज ईव्ही कारमुळे लावला जात होता. काही काळासाठी तो खराही ठरत होता. परंतू, नुकत्याच आलेल्या एका सर्व्हेने ५० टक्के ईव्ही मालक पुन्हा पेट्रोल, डिझेल कारकडे वळणार असल्याचे समोर आले आहे.

भारतात मारुती, फोक्सवॅगनने तर डिझेल कार विकणे बंद केले आहे. परंतू, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा, टोयोटा सारख्या कंपन्यांना काही केल्या डिझेल सोडवत नाही. त्यांच्या पेट्रोल, ईव्ही कार नाहीत असे नाही. उलट टाटा तर टॉपवर आहे. ह्युंदाईच्या दोन ईव्ही कार आहेत, टोयोटा अद्याप यात आलेली नाही. मग डिझेल कारचे असे फायदे काय आहेत जे कंपन्यांना आणि लोकांना सोडवत नाहीत.

डिझेलची कार पेट्रोलच्या तुलनेत जास्त मायलेज देते. यामुळे कमी इंधन लागते. तसेच डिझेलच्या कारचे इंजन जास्त टॉर्क तयार करत असल्याने चढणीला किंवा शहरातही चांगला पिकअप मिळतो. डिझेलचे इंजिन जास्त काळ चालणारे असते. पेट्रोल कमी मायलेज, कमी पिकअप आणि लाईफ चांगली असली तरी महागडे इंधन यामुळे थोडे बदनाम आहे.

ईव्ही कारचे सांगायचे झाले तर ईव्ही पिकअपला डिझेलपेक्षा जास्त पावरफुल आहे. मायलेजलाही आहे, परंतू ते बेभरवशी आहे. जास्त चढ, जास्त वेगात चालविली तर बॅटरी भराभरा खाली होते. मग ती पुन्हा कुठे चार्ज करायची असा यक्षप्रश्न गावातच नाही तर शहरातही आहे. अचानक मध्येच कुठे चार्जिंग संपले की मग बसा तिथेच.

गावखेड्यात गेला किंवा अन्य कुठेही गेलात तर अर्थिंग हा मोठा प्रश्न आहेच. अर्थिंग चांगले नसेल तर चार्ज होणार नाही. लोड घेणार नाही. तुमचा बोर्डच जळण्याची शक्यता अधिक. यामुळे ईव्ही असलेल्या लोकांचीही आता मानसिकता बदलत चालली असून जवळपास ५० टक्के मालक या भीतीला कंटाळून पुढची कार किंवा वाहन इंधनाचेच घेणार असल्याचे म्हणत आहेत.

डिझेल सेदान कार एकदा फुल केली की ७५०-८०० किमी जाते. मिनी एसयुव्ही ६००-७०० किमीच्या वर जाते. एसयुव्ही देखील जास्त किमी जाते. परंतू, हेच अंतर कापायचे असेल तर पेट्रोलची टाकी दोनदा, सीएनजी तीनदा भरावी आणि ईव्ही देखील तीन-चारदा चार्ज करावी लागते. मग जास्त लांबीचा प्रवास करणाऱ्या लोकांना डिझेलच कार सोईची वाटते.

आता एखाद्याचे उत्पन्नाच ठराविक, मध्यम वर्गाचे असेल तर तो ऑलराऊंडर कार निवडेल. गर्भश्रीमंत असेल तो रोजच्या प्रवासाला ईव्ही आणि लांबच्या ट्रीपला डिझेल-पेट्रोल अशा दोन कार ठेवू शकतो. कमी उत्पन्न असलेला व्यक्ती काही दोन कार पोसू शकत नाही. या डिझेल कारना आता हायब्रिड इंजिन टक्कर देण्याची तयारी करत आहे.

हायब्रिड कार या इंधन आणि बॅटरी अशा दोन्हीवर चालतात. त्यात स्ट्राँग हायब्रिड असेल तर ही कार हायवेवर एका वेगात चालण्यासाठी इलेक्ट्रीसिटी वापरते अन्यवेळी इंधन. यामुळे मारुतीची एक कार ११०० किमीची रेंजचा दावा करते.

बायोडिझेलबाबतही आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. परंतू, ते काही डिझेलचा पर्याय ठरू शकलेले नाही. ते कुठे मिळतही नाही. यामुळे आणखी काही वर्षे डिझेल कार या तयार होत राहणार आहेत. जो तो त्याच्या गरजेनुसार या वेगवेगळ्या इंधन पर्यायाच्या कार घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *