महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। इंग्लंडचा माजी फलंदाज आणि सरेचा महान क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे 5 ऑगस्ट रोजी निधन झाले. ग्रॅहम थॉर्प मृत्यूच्या चार दिवस आधी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी 55 वर्षांचे झाले होते. ते बरेच दिवस आजारी होते. मात्र त्यांच्या मृत्यूच्या 7 दिवसांनी त्यांच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे. थॉर्पे यांच्या पत्नीने थॉर्पे यांनी स्वत:चा जीव घेतल्याचा खुलासा केला. थॉर्प यांनी मे 2022 मध्ये आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ग्रॅहम थॉर्प यांची पत्नी अमांडा यांनी खुलासा केला की, ते गेल्या काही वर्षांपासून नैराश्य आणि चिंतेने त्रस्त होते. अलिकडच्या काळात ते खूप आजारी होते आणि त्याच्याशिवाय आम्ही चांगले राहू, असे त्याला वाटले आणि त्याने आत्महत्या केली, याचे आम्हाला खूप दुःख आहे. आम्ही त्याला एक कुटुंब म्हणून पाठिंबा दिला आणि त्याने अनेक, अनेक उपचार केले, परंतु दुर्दैवाने त्यापैकी काहीही काम झाले नाही.
ग्रॅहम थॉर्पने 1993 साली इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात त्याने इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 6744 धावा केल्या. त्याने कसोटीत 16 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत. याशिवाय थॉर्पने इंग्लंडसाठी 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 21 अर्धशतकांसह 2380 धावा केल्या आहेत. थॉर्प हे इंग्लिश कौंटी संघाचे अनुभवी खेळाडू होते. त्याने 341 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 49 शतकांच्या मदतीने 21937 धावा केल्या. तसेच, त्याने लिस्ट ए मध्ये 10871 धावा केल्या ज्यात त्याने आपल्या बॅटने 9 शतके झळकावली. थॉर्पने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 58 शतके झळकावली होती.
ग्रॅहम थॉर्पने 2005 मध्ये आपल्या कोचिंग करिअरला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला न्यू साउथ वेल्स आणि इंग्लंड लायन्स संघांसह प्रशिक्षक म्हणून काम केले. यानंतर, 2013 च्या सुरुवातीला, थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. यानंतर, 2020 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान तो संघाचा अंतरिम प्रशिक्षक बनला. 2022 मध्ये त्यांना अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते, परंतु त्यानंतर त्यांना गंभीर आजाराने ग्रासले.