समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार? सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान, म्हणाल्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। मागच्या पाच वर्षांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय उलथापालथींमुळे राज्याच्या राजकारणातील बरीच समिकरणं बदलली आहेत. दरम्यान, त्याचा प्रभाव विविध मतदारसंघांवरही पडला असून, तिथेही बदललेल्या परिस्थितीमुळे काही नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते पक्षांतर करतील, असे दावे केले जात आहेत. दरम्यान, मतदारसंघातील बदलेल्या परिस्थितीमुळे समरजित सिंह घाटगे आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे दोन प्रमुख नेते पक्षांतर करून शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना समरजित घाटगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला याबाबत माहिती नाही. समरजित यांच्याबाबतची ही माहिती मी तुमच्याचकडून ऐकतेय. पण समरजित घाटगे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. अतिशय कर्तृत्ववान नेतृत्व आहे. जीवनात त्यांनी संघर्ष केलेला आहे. अर्थातच महाराष्ट्रासाठी ते काही करू पाहत असतील, तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काही माहिती नाही. मला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे आज हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस आहे. हर्षवर्धन भाऊ तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ३ सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून, यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये हसन मुश्रिफ विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *