Raj Thackeray on Badlapur Crime: ‘लाडकी बहिणी’द्वारे कौतुक करून घेण्यात मग्न…; राज ठाकरे यांची बदलापूर घटनेवरून कडवट टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। बदलापूरमध्ये मंगळवारी पालकांचा उद्रेक पाहायला मिळाला होता. एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राजकारण देखील तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं, असं राज ठाकरे म्हणाले.

मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? , असं ते म्हणाले.

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *