महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर महाविकास आघाडीने उद्या म्हणजेच शनिवार २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात घोषणा केली होती, तर हा बंद राजकीय नसल्याचं सांगत काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जनतेला यात सामील होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली भूमिका जाहीर केली आहे.
मनसेची भूमिका काय?
सर्वसामान्य नागरिक उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले, तरच मनसेचा महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा असेल. महाराष्ट्र बंदच्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये कोणतेही राजकारण आणण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा नाही. परंतु जी निंदनीय घटना बदलापूरमध्ये घडली त्या घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम भूमिका बजावून त्या घटनेची दखल आणि तक्रार पोलिसांकडे नोंदवून घेतली होती, असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
उद्याचा महाराष्ट्र बंद हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही प्रकारे नागरिकांना वेठीला धरून अजिबात करायचा नाहीये. परंतु ज्या पद्धतीने या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्तपणे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत, त्याच पद्धतीने जर उद्याच्या बंदमध्ये नागरिक स्वतःहून बंद ठेवणार असतील, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नागरिकांना शंभर टक्के पाठिंबा असणार आहे. कारण या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध करत आहे, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.