महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाशी संबंधित धोरणांमध्ये मोठा बदल केला आहे. उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी सरकारने पूर्णपणे हटवली आहे. या मोठ्या निर्णयाची माहिती गुरुवारी एका अधिसूचनेत देण्यात आली. या बदलामुळे ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने 29 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. आता साखर कारखान्यांना उसाचा रस आणि साखरेच्या पाकापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. ही सूट 2024-25 साठी आहे. हा बदल 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे.
आतापर्यंत उसाचा रस किंवा साखरेच्या पाकापासून इथेनॉल बनविण्यावर बंदी होती. हे निर्बंध हटवण्यासोबतच सरकारने इथेनॉलच्या उत्पादनासाठी बी-हेवी आणि सी-हेवी मोलॅसिसचा वापर करण्यासही मान्यता दिली आहे. यासोबतच सरकारने डिस्टिलरीजना इथेनॉलच्या उत्पादनासाठी FCI कडून 23 लाख टन तांदूळ खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.
देशात इथेनॉलच्या उत्पादनाला चालना देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. इंधनात इथेनॉल मिसळण्यासाठी भारत सरकारने विशेष धोरण तयार केले आहे. या अंतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण आधीच केले जात आहे.
आता डिझेलमध्येही इथेनॉल मिसळण्याची तयारी सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळून देशाची ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.
या शेअर्सनी गाठला उच्चांक
इथेनॉल उत्पादनाच्या धोरणातील या बदलामुळे साखरेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यापारात साखरेचा शेअर 10 टक्क्यांनी वाढला आहे. दालमिया भारत शुगरचे शेअर्स सर्वाधिक 10.67 टक्क्यांनी वाढले आहेत.
त्याचप्रमाणे अवध शुगर, बजाज हिंदुस्थान शुगर, बलरामपूर शुगर, बन्नरी अम्मान शुगर्स, धामपूर शुगर मिल्स या साखरेच्या शेअर्समध्ये 8 ते 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
