महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटचा महान खेळाडू मानला जातो. त्याचवेळी, कसोटी फॉरमॅटचा विचार केला, तर सध्या जो रूटचे नाव आघाडीवर आहे. रुट कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडू शकतो, असे मानले जात आहे. या सगळ्या दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भविष्यात सर्वोत्तम कसोटीपटू बनू शकणाऱ्या खेळाडूचे नाव त्याने सांगितले आहे.
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये समावेश होऊ शकतो, असा अंदाज सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. एका प्रचार कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाला, ‘मी ऋषभ पंतला भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानतो. त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नाही. तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. अशीच कामगिरी करत राहिल्यास कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. मला विश्वास आहे की त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तो प्रतिभावान आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच हे करण्यात यशस्वी होईल.
डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंतचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. त्याचवेळी, बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची पूर्ण आशा आहे.
घोट्याच्या ऑपरेशनमुळे मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही पण या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी हा वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास गांगुलीला आहे. तो म्हणाला, ‘मला माहित आहे की मोहम्मद शमीचा दुखापतीमुळे संघात समावेश नाही, पण तो लवकरच परतणार आहे, कारण भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. भारताचे आक्रमण सध्या चांगले आहे.
गांगुली पुढे म्हणाला, ‘मी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची वाट पाहत आहे. संघाची खरी कसोटी तिथेच असेल. यानंतर संघाला जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे असून हे दोन्ही दौरे अत्यंत महत्त्वाचे असतील. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपस्थिती आणि शमीचे पुनरागमन यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी मजबूत होईल.