Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची सध्या चर्चा रंगतेय. भाजपाने किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली होती. मात्र सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोमय्या यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नकार कळवला आहे. तसेच त्यांनी भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार रावसाहेब दानवे यांना पत्र देखील पाठवलं आहे.

सोमय्या यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की “पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करतोय. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही”.

“मला न विचारताच घोषणा केलीत, ही पद्धत चुकीची आहे”
दरम्यान, सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी”.

सोमय्या यांनी म्हटलं आहे की “१८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजपा-शिवसेनेची मुंबईतल्या वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेल येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला ती पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य/कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी माझी जबाबदारी पार पाडली.

अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये : सोमय्या
सोमय्या दानवे व भाजपामधील वरिष्ठांना म्हणाले, “गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. या विभानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे. मी काम करतो, करत राहणार. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *