पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। गौरी आगमनानिमित्त सर्व प्रकारच्या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांसह अंबाडी, आळूची पाने, शेपू, मेथी, कोथिंबीरचे दर तेजीत आहेत. गौरीचे आगमन मंगळवारी झाले. घरोघरी विधीवत पूजन करण्यात आले. बुधवारी गौरी पूजन असून, भाज्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. महात्मा फुले मंडई, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लागणाऱ्या अंबाडी, आळूची पाने, शेपू, मेथी या पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली. नैवेद्यासाठी लागणाऱ्या पालेभाज्यांच्या जुडीचे दर ४० ते ६० रुपयांपर्यंत आहेत. आळूच्या पानांचे दर २० ते २५ रुपये आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत आहेत. पडवळचे किलोचे दर १०० ते १२० रुपये आहेत. गौरी आगमनानिमित्त भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, बहुतांश भाज्यांचे किलोचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाज्या, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. भाज्यांच्या प्रतवारीवरही परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर तेजीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लसूण, मटार महाग
परराज्यातून होणारी लसणाची आवक कमी झाली आहे. लसणाचा हंगाम संपला असून, किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर प्रतवारीनुसार ४५० ते ५०० रुपये आहेत. पुरंदर, वाई, सातारा, पारनेर भागातील मटारचे पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळे परराज्यातून मटार मागविण्यात आला आहे. मटारचे किलोचे दर ३०० ते ३५० रुपये आहेत. कांद्याचे दर तेजीत असून एक किलो कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांपर्यंत आहेत.

भाज्यांचे किलोचे दर
मटार – ३०० ते ३५० रुपये

बटाटा- ४५ ते ५० रुपये

कांदा – ६० ते ७० रुपये

फ्लाॅवर – १२० ते १४० रुपये

कोबी – ७० ते ८० रुपये

दोडका – १२० ते १४० रुपये

लसूण – ४५० ते ५०० रुपये

पडवळ -१०० ते १२० रुपये

कोथिंबीर – ७० ते ८० रुपये जुडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *