महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। High Blood Pressure: सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता अशा कारणांमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ‘निरोगी आरोग्य तरुणाचे, वैभव महाराष्ट्राचे’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ३१ लाख ७९ हजार पुरुषांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५ लाख ५३ हजार जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. यात पुरुषांचे प्रमाण १७ टक्के आहे.
उच्च रक्तदाबाची लक्षणे ताबडतोब दिसत नसली तरी त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळेच उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. जागतिक स्तरावर अकाली मृत्यूचे हे एक मोठे कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जागतिक स्तरावर चार पैकी एक पुरुष आणि पाच पैकी एका महिलेवर याचा परिणाम होतो.
त्यातही भारतातील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. ‘जामा नेटवर्क ओपन’च्या अहवालानुसार भारतात उच्च रक्तदाब असलेल्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढांमध्ये विकाराचे निदान झाले नाही किंवा त्यावर उपचार केले गेले नाहीत किंवा उपचार होऊनही उच्च रक्तदाब अनियंत्रित आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) या वर्षाच्या प्रारंभी अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार सकस आहार आणि शारीरिक हालचालींमुळे कोरोनरी हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते. यासह टाइप २ मधुमेह ८० टक्के टाळता येऊ शकतो.
ही आहेत लक्षणे
डोकेदुखी
श्वासोच्छ्वासाचा त्रास
हृदय वेगाने धडधडणे
डोके हलके होणे, चक्कर येणे
घाम फुटणे, पायांना सूज येणे
अकारण अशक्तपणा वाटणे
जास्त वेळ चालल्यावर किंवा जिना चढताना दम लागणे
ही आहेत कारणे
अयोग्य जीवनशैली
धूम्रपान, मद्यपान
खूप ताण असणे
तळलेल्या उच्च कॅलरीयुक्त अन्न/पेयांचे सेवन
पाणी कमी पिणे
आनुवंशिक कारणे
निद्रानाश
अशी घ्या काळजी
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहाराचे नियोजन
जंक फूडपासून दूर राहा
व्यायाम नियमित करा
सहा ते सात तास पुरेशी झोप घ्या
मीठ कमी प्रमाणात सेवन करा
परिणाम
ब्रेन स्ट्रोक
आंधळेपणा
मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका
धमन्या अरुंद होतात
पाय काळे पडतात
हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होतात