कोरोनाच्या XEC व्हेरिएंटचा २७ देशांत फैलाव, काय काळजी घ्यावी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। कोरोनाच्या नवीन एक व्हेरिएंटने जगात पुन्हा एकदा भीती निर्माण केली आहे. कोविड -१९ चा एक ‘अधिक संसर्गजन्य’ व्हेरिएंट XEC संपूर्ण युरोपमध्ये अधिक वेगाने पसरत आहे आणि तो लवकरच प्रमुख स्ट्रेन बनू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, नवीन व्हेरिएंट (Covid 19 New XEC Variant) पहिल्यांदा जर्मनीमध्ये जूनमध्ये आढळून आला होता. तेव्हापासून XEC व्हेरिएंट ब्रिटन, अमेरिका, डेन्मार्क आणि इतर अनेक देशांमध्ये पसरला.

कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरियंटचा एक उपवंश आहे. काही नवीन म्युटेशन्स आहेत जे या नवीन व्हेरिएंटला सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शरद ऋतूमध्ये पसरण्यास मदत करू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

XEC चा २७ देशांत फैलाव
XEC व्हेरिएंट हा पूर्वीच्या ओमिक्रॉन सबव्हेरिएंट KS.1.1 आणि KP.3.3 चा हायब्रिड प्रकार आहे. जो सध्या युरोपमध्ये अधिक आढळून येतो. आतापर्यंत पोलंड, नॉर्वे, लक्झेंबर्ग, युक्रेन, पोर्तुगाल आणि चीनसह २७ देशांतील ५०० नमुन्यांमध्ये XEC व्हेरिएंट आढळून आला आहे, असे वृत्त द इंडिपेंडंटने दिले आहे. डेन्मार्क, जर्मनी, ब्रिटन आणि नेदरलँड्समध्ये हा व्हेरिएंट वाढत असल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.

XEC धोकादायक बनू शकतो,तज्ज्ञांचा इशारा
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर फ्रँकोइस बॅलॉक्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की XEC हा इतर अलीकडील काही कोविड व्हेरिएंटसच्या तुलनेत थोडासा संसर्ग जाणवतो. तरीही लसीमुळे चांगले संरक्षण मिळायला हवे. पण XEC धोकादायक बनू शकतो.

XEC ची लाट येऊ शकते का?
कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक एरिक टोपोल यांच्या माहितीनुसार, XEC फैलावाची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्याची लाट येण्याआधी अनेक आठवडे, महिने लागतील.” “XEC निश्चितपणे सक्रिय होत आहे. तो पुढील व्हेरिएंट असल्याचे दिसते,” असे टोपोल म्हणाले.

XEC Covid लक्षणे काय?
XEC व्हेरिएंटची लक्षणे पूर्वीच्या कोरोनासारखीच आहेत. ताप, घसा खवखवणे, खोकला, वास न येणे, भूक न लागणे आणि अंगदुखी ही त्याची लक्षण आहेत. लस आणि बूस्टर डोसमुळे गंभीर आजारी आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून पुरेसे संरक्षण मिळेल.

लोकांनी काय काळजी घ्यावी?
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने लोकांना स्वच्छतेची काळजी घेण्याचा आणि स्वच्छ हवेसाठी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. संशोधकांनी नवी व्हेरिएंटसची लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी XEC चे अधिक बारकाईने निरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *