स्वच्छ सांस्कृतिक उत्सव…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ सप्टेंबर ।। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘’स्वच्छता ही सेवा पंधरवडा’’ निमित्त आयोजित स्वच्छ सांस्कृतिक उत्सवात मराठी सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली आहे.

२ ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अंतर्गत शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत सी सर्कल, स्पाईन रोड, भोसरी येथे ‘स्वच्छ सांस्कृतिक उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सावाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास मराठी सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहे. यासोबतच विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यांसह शहरातील पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थितीही राहणार आहे.

तरी आपले शहर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *