सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो इतक्या लोकांचा मृत्यू; कारण काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ सप्टेंबर ।। अँटिबायोटिक्सचा शोध हा वैद्यकीय विश्वातील क्रांतिकारक शोध मानला जातो. मात्र, आता हाच शोध माणसासाठी जीवघेणा ठरतोय, असे एका अहवालातून समोर आले आहे. सुरुवातीच्या काळात माणसाला एखादी दुखापत झाल्यास, आजारी पडल्यास त्यातून बरे होण्यासाठी उपचार नव्हते. मात्र, अँटिबायोटिक्स आल्यापासून प्रत्येक आजारासाठी आज अँटिबायोटिक्सच्या स्वरूपात औषधे उपलब्ध आहेत. परंतु, आरोग्यासाठी वरदान ठरणारी हीच औषधे जगासमोर आरोग्याला आव्हानही उभे करत आहेत. नवीन जागतिक विश्लेषणानुसार, अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स म्हणजे ‘एएमआर’मुळे पुढील २५ वर्षांमध्ये जवळपास चार कोटी लोकांचा मृत्यू होईल, अशी माहिती आहे

अभ्यासात असे आढळून आले आहे की, लसीकरण आणि स्वच्छतेतील प्रगतीमुळे लहान मुलांमध्ये अँटिबायोटिक्समुळे होणाऱ्या संबंधित मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे; परंतु वयस्कांमध्ये हा कल उलट असल्याचे चित्र आहे. ‘एएमआर’च्या जागतिक प्रभावाचा मागोवा घेण्यासाठी करण्यात आलेले हे पहिलेच संशोधन आहे. या संशोधनात नक्की काय आढळून आले आहे? नक्की हा आजार काय आहे आणि ही समस्या किती भीषण आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

एएमआर म्हणजे काय?
अँटिबायोटिक्सच्या चुकीच्या किंवा अतिवापरामुळे अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स म्हणजेच ‘एएमआर’ची समस्या उद्भवते. त्यालाच सुपरबग्स म्हणूनही ओळखले जाते. सुपरबग्समुळे दरवर्षी प्राण गमावणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. शरीरातील जीवाणू, विषाणू, बुरशी व पॅरासाइट्स वेळेनुसार बदलत असतात आणि या बदलांवेळी औषधांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याच वेळी अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स (एएमआर) निर्माण होतात. या स्थितीत संसर्गावर उपचार करणे कठीण होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी संथपणे सुरू असते. परंतु, माणूस, प्राणी व वनस्पतींमध्ये औषधांचा, विशेषत: अँटिबायोटिक्सचा अतिरेक आणि अनावश्यक वापर केल्याने ही प्रक्रिया वेगवान होत आहे. अभ्यासाचे लेखक, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स (IHME)मधील डॉ. मोहसेन नागवी एका निवेदनात म्हणाले, “अँटीमायक्रोबियल औषधे आधुनिक आरोग्य सेवेचा एक आधारस्तंभ आहेत आणि त्यांना वाढता प्रतिकार हे चिंतेचे प्रमुख कारण आहे.“

हे संकट किती मोठे आहे?
लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास ग्लोबल रिसर्च ऑन अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (ग्रॅम) प्रोजेक्टने केला आहे. संशोधकांनी १९९० ते २०२१ पर्यंत झालेले मृत्यू आणि २०५० पर्यंतच्या मृत्यूंच्या अंदाजाची माहिती घेण्यासाठी २०४ देशांमधील ५२० दशलक्ष वैयक्तिक रेकॉर्डमधील डेटाचा वापर करण्यात आला आहे. संशोधकांनी २२ रोगजनक (पॅथोजेन), ८४ औषधे व रोगजनकांचे संयोजन आणि ११ संसर्गजन्य आजार, जसे की मेंदुज्वर; यांच्या उपलब्ध डेटाचा आढावा घेतला आहे. अभ्यासानुसार, १९९० ते २०२१ या काळात जगभरातील १० लाखांहून अधिक लोकांचा सुपरबग्समुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *