महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। पदार्पणवीर कामरान घुलाम ( Kamran Ghulam) याच्या शतकी खेळीने दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पण, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पुनरागमन करताना पाकिस्तानचा उर्वरित निम्मा संघ १०७ धावांत गुंडाळला.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानने संघात काही बदल केले. बाबर आझम, शाहिन आफ्रिदी, नसीम शाह यांना बाकावर बसवले. बाबरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या कामरान घुलामने २२४ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ११८ धावांची खेळी केली. सईम आयूबने ७७ धावांची खेळी करून कामरानला चांगली साथ दिली. मोहम्मद रिझवान ( ४१) व सलमान आघा ( ३१) यांनी चांगला खेळ केला होता. पाकिस्तानने पहिल्या दिवशी ५ बाद २५९ धावा उभ्या केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी फास आवळला..
अवघ्या पाच धावांची भर घालून पाकिस्तानला मोठा धक्का बसला. मोहम्मद रिझवानला ब्रेडन कार्सने माघारी पाठवले. साजीद खान ( २) जॅक लिचच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाठोपाठ सलमान आघाही माघारी परतल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत आला होता. आमेर जमाल व नोमान अली यांनी ९व्या विकेटसाठी धावांची भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर फेकण्याचा प्रयत्न केला. कार्सने ही जोडी तोडली आणि जमाल ३७ धावांवर माघारी परतला. नोमान अलीची ( ३२) विकेट घेऊन लिचने पाकिस्तानचा पहिला डाव ३६६ धावांवर गुंडाळला.जॅक लिचने ४ विकेट्स घेतल्या. ब्रेडन कार्सने ३ व मॅथ्यू पॉट्सने दोन विकेट्स घेतल्या.