महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑक्टोबर ।। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करत सर्वसामान्य महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सुरू केली आहे. या योजनेचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र, दुसरीकडे महागाईतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ( दाजींच्या ) खिशाला कात्री लागली जात आहे.
दिवाळी हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महिन्यांचे बजेट कोलमडून लाडक्या बहिणींची फोडणी महाग झाल्याचे चित्र दिवे परिसरात पाहायला मिळत आहे.
लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूर्वी खाद्यतेलाचा 14 किलोचा एक डबा 1600 रुपयाला मिळत होता, तो आता तब्बल 2200 रुपयाला मिळत आहे. हरबरा डाळ पूर्वी 70 रुपये किलो होती, ती आता 100 रुपयांना मिळत आहे. खोबरेही 120 रुपयांवरून 230 रुपये किलो इतके महाग झाले आहे. रवा 35 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बेसनाचे दर 80 रुपयांवरून 110 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
अशाप्रकारे जीवनावश्यक साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांचे महिन्यांचे आर्थकि बजेट कोलमडले आहे. शासनाच्या दर महिन्याच्या मदतीमुळे लाडक्या बहिणी खुश असल्या तरी दुसरीकडे मात्र दाजींच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.