Maharashtra Election : राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी, नेमकी कुणाला मिळणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑक्टोबर ।। विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठी बातमी हाती आली आहे. राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी सुट्टी असणार आहे. यासाठी मतदानासाठी सुट्टी देण्याबाबत सरकारने परिपत्रक जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासनाने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. शासन परिपत्रकानुसार, राज्यातील विविध मतदारसंघातील व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम आणि इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असणाऱ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे. यानुसार, उद्योग विभागात येणाऱ्या उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील. या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने या व्यक्तीच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही.

या शासन परिपत्रकाचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्याऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. तसेच कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *