महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी यांच्यात सुंदोपसुंदी चालू असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, मनसे व तिसरी आघाडी यांच्याकडूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सत्ताधारी व विरोधी आघाडीतील पक्षांवर सातत्याने टीका केली आहे. शरद पवारांवर त्यांनी केलेल्या टीकेला आता खुद्द शरद पवारांनी आव्हानाच्या रुपात प्रत्युत्तर दिलं आहे.
जातीयवादाची टीका आणि पवारांचं आव्हान
राज ठाकरेंनी मुलाखती व भाषणांमधून वेळोवेळी शरद पवारांना महाराष्ट्रातील जातीयवादासाठी कारणीभूत ठरवलं आहे. महाराष्ट्रात १९९८ सालापासून जातीयवाद वेगाने फोफावल्याचा दावा राज ठाकरेंनी भाषणातून केला असून त्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कारणीभूत ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या याच आरोपांना आता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
राज ठाकरेंनी जातीयवादाचे आरोप केल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “मला महाराष्ट्रात एक उदाहरण दाखवावं की मी जातीयवादी राजकारण केलं. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही, फक्त वक्तव्य केली, टीका-टिप्पणी केली त्यांच्या वक्तव्यावर आपण काय भाष्य करायचं? दुर्लक्ष करायचं”, असं शरद पवार म्हणाले.
‘जनतेनं त्यांना एकच जागा दिली’
दरम्यान, शरद पवारांनी यावेळी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा एकमेव आमदार निवडून आला. त्याचा संदर्भ शरद पवारांनी यावेळी दिला. “महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात एकच जागा दिली”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
