महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ नोव्हेंबर ।। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीमच्या मैदानात उतरल्यामुळे राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष लागलेय. सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी मागणी महायुतीमधील काही नेत्यांकडून झाली. शनिवारी एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर माहीममधून माघार घेणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे माहीमध्ये आता तिरंगी लढत होणार, यात शंकाच राहिली नाही. पण यामध्ये आता नवा ट्विस्ट आलाय.
एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेण्याबाबत वक्तव्य केलेय. पण त्यांनी राज ठाकरेंना अट घातली आहे. मी त्याग करायला तयार आहे, राज ठाकरेंनी महायुतीविरोधातील सर्व उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी सदा सरवणकर यांनी केली.
मी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार आहे, मात्र मनसेने महायुतीच्या विरोधातील सगळेच्या सगळे उमेदवार मागे घ्यावेत, असे वक्तव्य शिंदेंचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेय. याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली.
मी त्याग करायला तयार आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे महत्त्वाचे आहे. मनसेने सगळ्याच ठिकाणी महायुती विरोधात उमेदवार उभे केले आहे ते त्यानी मागे घ्यावेत. त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यास मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, त्यासाठी महायुतीचे सगळ्यात जास्तीत जात आमदार निवडून आले पाहिजेत. ते आमच्या विरोधात उमेदवार देत असतील तर त्यांनी सहकार्याची अपेक्षा करू नये. आम्हाला ठाकरे कुटुंबाचा आदर आहे. सगळीकडे आमच्या विरोधात उमेदवार उभे करायचे आणि इकडे सहकार्य मागायचं ही भूमिका योग्य नाही, असा खेद सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.